'वर्क फ्रॉम होम ' बायको

'वर्क फ्रॉम होम ' बायको 

- गौरी गाडेकर 

























हाय !

पत्र बघून चकित झालास ना ? म्हणजे डायरेक्ट बोलायचं सोडून, मेसेज-मेल न करता चक्क पत्र!अर्थात, पूर्वी  अर्ध्या -एका मार्कासाठी मायना, तारीख वगैरे लिहून बोअर व्हायचे. त्यामुळे ते सगळं ड्रॉप केलंय. 
सॉरी ! हो.माफी मागायलाच पत्र लिहिलं. कारण एवढं सगळं सलग बोला-ऐकायला हल्ली वेळच  कुठे असतो आपल्याला? 

मघाशी मी किचनमध्ये असताना बॉसचा कॉल आला. क्लिअर ऐकू येईना, म्हणून हॉलमध्ये गेले. कॉल संपवून परत आले तर ओटाभर दुधाचा महापूर. वाटेत भेटेल त्याला  चपेटमध्ये घेत. 
मग काय?  माझ्या तळपायाची तिडीक मस्तकात गेली. बॉस, त्याचं ते डिस्कशन, त्याची माझ्याकडून असलेली एक्सपेक्टेशन्स, ..... दूध, गॅस, ओटा, दुधाच्या ओहोळात सापडलेली स्वच्छ घासून उपडी वाळत ठेवलेली भांडी....... सगळा राग शेवटी तुझ्यावर निघाला. नेहमीप्रमाणेच.
गेले चार -पाच महिने 24×7 फक्त  एकमेकांचीच  तोंडं बघून विटलोय आपण. 
पण यावेळी मात्र तू तुझ्या कामातून ब्रेक घेऊन उठलास. मला एका शब्दानेही उत्तर न देता गुपचूप जाऊन तो ओटा, गॅस, भांडी सगळं स्वच्छ केलंस. 
त्यावरही मी चिडलेच. खरं तर अजूनच चिडले. 
"आता कशाला ढोंग करतोयस मदतीचं? तुझ्या आईला कळलं, तर मलाच ऐकवतील. मार्च एंडलाच म्हणाल्या होत्या, 'बाया येत नसतील ना? पण त्याला काही करायला लावू नकोस हं. सवय नाहीय त्याला असल्या कामांची.'....आणि मी काय स्वयंपाक, धुणी, भांडी, झाडू-पोछा करून मग पाळण्यात जाऊन जोजो करत होते?  बोल ना आता काहीतरी. असा घुम्यासारखा का बसलास तोंड मिटून? "
तू तोंड उघडलंस, "स्वयंपाक व्हायचाय ना? थांब. मी डाळ-खिचडी करतो. तू बस तुझ्या कामाला."
माझं कामातही लक्ष लागेना. म्हणून हे पत्र. 

माझे बाबा चिडून बडबडत असायचे,तेव्हा आई शांतपणे आपली कामं  करत राहायची. "तूपण सुनाव ना त्याना," म्हटलं तर सांगायची, "जाऊदे. त्यांचा स्वभावच तापट आहे. काय करणार? तुम्ही चिमण्या आपापल्या घरी  उडून जाल. मग आम्ही दोघेच एकमेकांना. त्याना मी आणि मला ते." 
ते आठवलं रे आज. गेले चार-पाच  महिने  मला तू आणि तुला मी. म्हणजे नातेवाईक, कलिग्ज, फ्रेंड्स भेटतात म्हणा;पण  व्हर्च्युअली. खरे आपणच दोघे  एकमेकांना. 

सुरुवातीला तू म्हणत होतास, "लग्न नको, लिव्ह-इन बरं." पण  मला थोडी इन्सिक्युरिटी  वाटत  होती, "तुझ्या आई-वडिलांना विचार, चालेल का, म्हणून." मी त्याना पाहिलं नव्हतं;पण त्यांच्या भौगोलिक स्थानावरून मी बांधलेला कयास  खरा ठरला. अर्थात माझ्या आई-बाबांनाही पटलं नसतंच ते. 
आता वाटतं, लिव्ह-इन असतं, तर मी तुला एवढं  गृहीत धरलं नसतं. सारखी भांडत नसते राहिले तुझ्याशी. 
पण आता मला  रिअलाइज झालीय माझी चूक. 

एका गंमत आठवली. आपलं लग्न झालं, तेव्हा साता जन्माचं कॉन्ट्रॅक्ट झाल्याने दोन्ही आया खुश झाल्या. गेल्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट रिन्यूअलच्या आधी दोन-चार दिवस  दोघींचे फोन. 'अहो आई'ना  मी फक्त "हो,हो"म्हटलं. आईवर मात्र मी चांगलीच तडकले,"हे वडाची पूजा वगैरे थेरं  करायला मला वेळही नाही आणि इंटरेस्टही नाही." मग 'नदी नारे ना  जाओ शाम'मधल्या 'जैबे करो'च्या धर्तीवर बार्गेनिंग करत "बरं तर. कांदा-लसूण टाळणं जमत नसेल, तर निदान नॉनव्हेज तरी  नको खाऊस"वर सेटल केलं....... यावर्षी आई म्हणाल्या,"पूजा नाही  जमणार या लॉकडाऊनमध्ये. नुसताच उपास केलास, तरी  चालेल."  आईतर  गेल्या वर्षीच्या धसक्यातून अजून बाहेरच आली नाहीय. त्यामुळे ती 'वटपौर्णिमा' हा विषय टाळून  इतरच बोलत राहायची. अशी मजा. 
एक मात्र मला ठाऊक आहे की तुझ्यासाठी मी उपासतापास  करत  नसले, तरी मला तू खूप आवडतोस. या लॉकडाऊनमुळे सगळी इक्वेशन्स चेंज झालीयत, त्यामुळे चिडचिड होते. पण आय रिअली लव्ह यू . आय केअर फॉर यू. 
चल. मला कॉल येतोय. 
तू मला एवढं समजून घेतोस, त्याबद्दल  मनापासून थँक्स. 

गौरी गाडेकर 




Comments

Popular posts from this blog

द्रौपदी