द्रौपदी
द्रौपदी
आटपाट नगर होतं
त्यात मोठमोठे वाडे होते तालेवारांचे
त्यात पाळण्यात रडत होते मुलगे
दुडुदुडु धावत होते मुलगे
शाळेत न जाण्याचा हट्ट करत होते मुलगे
मस्ती,गुंडागर्दी करत होते मुलगे
हो. त्या आटपाट नगरात
तालेवारांच्या त्या मोठमोठ्या वाड्यांत
जन्माला येत होते फक्त मुलगे
मुलगे,....मुलगे
वंशाचे दिवे
आणि हे वंशाचे दिवे पेटवण्यासाठी
आणि हे वंशाचे दिवे तेवत ठेवण्यासाठी
आवश्यक असणा-या स्त्रिया
आयात केल्या जायच्या
आसपासच्या नगरांतून
स्त्रिया,
हुंडा,
वरदक्षिणा,
मानपान
आणि असं बरंच काही
जन्मभर चालणारं
तर एक दिवस अक्रीतच घडलं
आटपाट नगरातल्या
एका तालेवाराच्या
भल्यामोठ्या वाड्यात
एक मुलगी जन्मली
दोनशे वर्षांनंतर म्हणे
त्या खानदानात
मुलगी जन्माला आली
देवाची कृपा म्हणायची
की
धाडस मातापित्याचं?
बहुधा पित्याचं
धाडस मुलगी होऊनही तिला जिवे न मारण्याचं
धाडस टोपभर उकळत्या दुधात टाकून
तिला पोटभर दूध न पाजण्याचं
धाडस खोल खड्डा खणून
दाईकरवी जिवंत न गाडण्याचं
धाडस इतर मार्ग चोखाळून
तिचं आयुष्य न संपवण्याचं
खूप मोठं धाडस पित्याचं
खूप मोठं धाडस पित्याचं
अख्ख्या वाड्याने
नव्हे अख्ख्या गावाने
पहिल्यांदाच पाहिली
लहान मुलगी दिसते कशी, हसते कशी
लहान मुलगी रडते कशी,पडते कशी
आईकाकींच्या माहेरगावीही
एव्हाना पसरलं होतं लोण
खात्रीपूर्वक मुलगा व्हावा
परदेशीही जाती कोण
सा-या पंचक्रोशीत
तिच्या तोलाची मुलगी नाही
बिचारीला मैत्रीण नाही
खेळ नाही, खेळणं नाही
नगरातल्या दुकानांतही
बाहुलीबोळकी काही नाही
रांगूही लागली नव्हती
येताहेत मागण्या तेव्हापासून
शेजारून, गावातून,
तालेवारांच्या दूरदूरहून
बाप बघतोय दिवास्वप्नं
लेकीच्या स्वयंवराची
स्वयंवर की लिलावाची बोली?
बघू. ती मोठी होईल त्यावेळी
आई मात्र चिंताक्रांत
छातीत तिच्या सदैव धडकी
काय होईल पोरीचं
वयात येईल जेव्हा लाडकी
मिळेल तिला चांगला वर
चांगलं घर, चांगलं सासर?
मिळेल छाया सुखाची?
की भाळी भोग लिहिला आहे
द्रौपदी व्हायचा
अख्ख्या खानदानाची?

Comments
Post a Comment